Ratnagiri: रत्नागिरीत बाप्पाच्या चलचित्रातून महिलांवर होणाऱ्या अत्याचाराला अनुसरून देखावा
सध्या गणेशोत्सवामुळे जागोजागी आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. अनेक ठिकाणी बाप्पाचे आगमन मोठ्या जल्लोषात झाले तर काल झालेल्या दीड दिवसांच्या बाप्पांचे विसर्जन देखील वाजत गाजत आणि जल्लोषात झाले. गणेश चतुर्थीनिमित्त अनेक ठिकाणी म्हणजेच गणेश मंडळात, घरोघरी बसवणाऱ्या बाप्पासाठी तसेच मोठमोठ्या पंडालात अनोखे असे देखावे उभारण्यात आले आहेत.
काहींनी एकाद्या दैवीठिकाणाचा देखावा उभारला आहे, तर काहींनी सुंदर आणि आकर्षक असा देखावा साकारला आहे, तसेच काहींनी बाप्पाच्या मुर्तीसोबतच देखावा देखील इकोफ्रेंटली पद्धतीने साकारला आहे. अनेक ठिकाणी गणपती बाप्पासाठी साकारलेल्या देखाव्यातून अनेक वेगवेगळ्या प्रकारचे संदेश देण्याचा प्रयत्न देखील केला आहे.
अशाच प्रकारचा एक महत्त्वाचा संदेश देणारा देखावा रत्नागिरीमध्ये साकारण्यात आलेला आहे. हा देखावा सध्या समाजात चालू असणाऱ्या महिला अत्याचाराच्या घटनांवर आधारित साकारण्यात आलेला आहे. ज्यामध्ये बाप्पा स्वत: भक्तांसोबत बोलत आहेत असं दाखवण्यात आलेलं आहे. ज्यात सर्वात आधी रामायणाची कथा दाखवण्यात आली आहे. त्यालाच अनुसरून बदलापूरमध्ये झालेली दोन लहान मुलींसोबत अत्याचाराची घटना देखील दाखवण्यात आलेली आहे. तसेच ही घटना दाखवत असताना महिलांवर होणाऱ्या अत्याचाराला कसा आळा आणि बंधन घालता येईल याचा संदेश देण्यात आलेला आहे.